आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिरूर शहरात विविध शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांना शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या ताई अभिजित पाचर्णे तसेच सर्व नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली.
सर्वप्रथम न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर येथे आयोजित कार्यक्रमास भेट देण्यात आली. यावेळी सौ. मनीषा ताई ज्ञानेश्वर कटके, नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या ताई अभिजित पाचर्णे तसेच नगरसेवक उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर दिव्यांग बांधवांनी आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यास उपस्थित राहून सहभागी बांधवांची भेट घेत त्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. समाजातील एकोपा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश यावेळी देण्यात आला.
शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ येथे लोकनेते मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच कार्यक्रमात आयोजित दिंडी सोहळ्यास भेट देत विद्यार्थी, शिक्षक आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यानंतर आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित वारी उत्सवात सहभागी होत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वारकरी परंपरेवरील सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि सामाजिक मूल्ये जपणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वुमन्स सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित अन्नदान (खिचडी वाटप) उपक्रमालाही भेट देण्यात आली. उपस्थित नागरिकांशी संवाद साधत समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले तसेच सामाजिक ऐक्य, सेवा आणि सहकार्याचा संदेश देण्यात आला.
या सर्व उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, वारकरी परंपरेबद्दल जागरूकता, सामाजिक एकोपा आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. शिरूर नगरपरिषद सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत असून अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे.



