शिरूर नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. घोडनदी परिसरातील आरक्षण क्र. ५७ वरील शासकीय जागा नगरपरिषदेकडे कायम ठेवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
पूर्वी औद्योगिक विकासासाठी राखीव असलेल्या या जागेचा मंजूर विकास आराखड्यानुसार सार्वजनिक हितासाठी वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या जागेवर क्रीडांगण, सार्वजनिक बगीचा, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह आणि व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शिरूर शहरातील नागरिकांना आधुनिक सार्वजनिक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
नगरपरिषदेकडून संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली असून, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. विशेष सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मान्यता देत पुढील आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेसाठी ठराव मंजूर करण्यात आला.
या प्रकल्पामुळे शहरातील युवकांसाठी क्रीडा सुविधा, नागरिकांसाठी हिरवाईयुक्त सार्वजनिक बगीचा, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक ग्रंथालय, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृह तसेच स्थानिक व्यापाराला चालना देणारे व्यापारी संकुल विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिरूर शहराच्या नियोजनबद्ध, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला दीर्घकालीन बळ मिळेल.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे यांनी सांगितले की, शिरूर शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नागरिकांसाठी अधिकाधिक सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. आरक्षण क्र. ५७ वरील जागा नगरपरिषदेकडे कायम ठेवण्याचा निर्णय हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा असून, पुढील सर्व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा विकास प्रकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
विशेष सर्वसाधारण सभेस नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे, उपनगराध्यक्ष, सभापती, उपसभापती, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सभेत शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना देणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
